सलग तिसऱ्या वर्षी गणेशभक्तांसाठी रोशन चाफेकर यांचा ‘गणपती आरती संग्रह’ उपक्रम; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते अनावरण
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना पारंपरिक आरत्या सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने भाजपचे नगरसेवक तथा दक्षिण रायगड जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी ‘गणपती आरती संग्रह’ प्रकाशित करण्यात आला आहे. या आरती संग्रहाचे अनावरण महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते अलिबाग येथे करण्यात आले.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. घराघरांत तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची आरती मोठ्या भक्तिभावाने केली जाते. गणेशभक्तांना विविध पारंपरिक आरत्या एकाच ठिकाणी सहज उपलब्ध व्हाव्यात आणि उत्सवातील भक्तिभाव अधिक वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने रोशन चाफेकर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवित गणेशभक्तांपर्यंत आरती संग्रह पोहोचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. यंदाही मोठ्या संख्येने गणेशभक्तांना या ‘गणपती आरती संग्रहा’चे वितरण करण्यात येणार असल्याचे रोशन चाफेकर यांनी सांगितले.
यंदाच्या आरती संग्रहाचे अनावरण थेट महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते झाल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करत सर्वसामान्य गणेशभक्तांपर्यंत आरत्यांचा संग्रह पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
दरम्यान, अलिबाग येथे आयोजित भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ‘युवा शक्ती, संधी आणि विकसित भारताचा संकल्प’ या विषयावरील अभिनंदन प्रस्ताव मांडण्याची संधीही रोशन चाफेकर यांना मिळाली.
यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, आमदार योगेश सागर, आमदार रवी पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हा सरचिटणीस सतीश धारप, पंडित पाटील, प्रशांत शिंदे, महेश मोहिते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश थोरे, रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.