अपघातग्रस्तांसाठी धावणारा रोह्याचा ‘देवदूत’; बिलाल मोरबेकर यांचा ‘जीवनदूत’ पुरस्काराने गौरव
रायगड पोलीस दलाचा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन्मान; निःस्वार्थी सेवेला पालकमंत्री भरत गोगावले यांची दाद
रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते
रोहा तालुक्यात कुठेही रस्ता अपघात घडला की शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी जखमींच्या मदतीसाठी धावून जाणारे रोह्याचे सामाजिक कार्यकर्ते बिलाल मोरबेकर यांच्या निःस्वार्थी सेवेला रायगड पोलीस दलाने सलाम केला आहे. रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘जीवनदूत’ सन्मान सोहळ्यात बिलाल मोरबेकर यांना विशेष ‘जीवनदूत’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
कुरूळ येथील आर.सी.एफ. सभागृहात आयोजित या सोहळ्यात रायगडचे पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अलिबाग उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, रिलायन्स फाऊंडेशनचे शशांक गोयल, रमेश धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रोहा तालुक्यातील अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे, जखमींना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अपघातस्थळावरून बाहेर काढणे आणि वेळेत रुग्णालयात दाखल करणे, अशी महत्त्वपूर्ण सेवा बिलाल मोरबेकर अनेक वर्षांपासून करत आहेत. जखमींना विनामूल्य रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे, औषधोपचारासाठी मदत करणे, तसेच अकस्मिक मृत्यू झालेल्या व्यक्तींचे वारस किंवा बेवारस मृतदेह इच्छित स्थळी वेळेत पोहोचविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे, अशी त्यांची सेवाभावी कार्याची परंपरा आहे.
“अपघातग्रस्तांना मदत करणारे हे खरे देवदूत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते इतरांचे प्राण वाचवतात. अशा निःस्वार्थी व्यक्तींचे दरवर्षी कौतुक झाले पाहिजे. त्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू,” असे आश्वासन पालकमंत्री भरत गोगावले यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनीही जीवनदूतांच्या कार्याचे कौतुक केले. “रायगड हा विविध नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणारा जिल्हा आहे. संकटाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचविणारे जीवनदूत खरे देवदूत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ही माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचेही जावळे यांनी नमूद केले.
“रस्ता सुरक्षेबाबत झालेल्या जनजागृतीमुळे अपघातांचे प्रमाण आणि अपघातातील मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. मात्र अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणारे जीवनदूत आजही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी प्रास्ताविकात सांगितले.
रायगड पोलीस प्रशासनाने बिलाल मोरबेकर यांच्या कार्याचा गौरव करताना, “आपण अनेक वर्षांपासून रस्ते अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचविण्याचे कार्य करीत आहात. आपली ही निष्काम सेवा जीवनदूतासारखी असून, भावनिक व सामाजिक जबाबदारीने आपण करत असलेले कार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे,” असे गौरवोद्गार काढले.
या सोहळ्यात रायगड जिल्ह्यात जीवनदूत म्हणून कार्य करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी आभार मानले.
अपघातग्रस्तांसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या बिलाल मोरबेकर यांच्या या निःस्वार्थ सेवेला मिळालेला ‘जीवनदूत’ पुरस्कार म्हणजे रोह्याच्या सेवाभावी कार्याची रायगड पोलीस दलाने केलेली दखलच ठरली आहे.