तळा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा; उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांचे चिरंजीव अथर्व बनले ‘एम.डी. डॉक्टर
तळ्याच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद; जन्मभूमीतच रुग्णसेवा करण्याचा डॉ. अथर्व यांचा संकल्प
प्रतिनिधी / तळा
तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांचे चिरंजीव अथर्व चंद्रकांत रोडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी ‘एम.डी. मेडिसिन’ (M.D. Medicine) ही पदवी परीक्षा अत्यंत प्रतिष्ठेने उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे तळा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका स्थानिक तरुणाने ‘एम.डी.’ पदवी मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या यशामुळे रोडे घराण्यासह संपूर्ण तळा तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या वैद्यकीय नकाशावर उज्वल झाले आहे.
डॉ. अथर्व हे लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ‘गो. म. वेदक विद्यामंदिर, तळा’ येथे झाले. माध्यमिक शालांत (१० वी) परीक्षेत त्यांनी विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी पुढील उच्च माध्यमिक (१२ वी) शिक्षण पुणे येथून पूर्ण केले. वैद्यकीय क्षेत्रातील ‘एम.बी.बी.एस.’ (MBBS) आणि त्यानंतर अत्यंत कठीण मानली जाणारी ‘एम.डी.’ (MD) ही उच्च पदवी त्यांनी सेवाग्राम, वर्धा येथील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातून कठोर परिश्रमांच्या जोरावर प्राप्त केली.
तरुणांसाठी ठरले प्रेरणास्थान
कुटुंबाचे भक्कम आर्थिक पाठबळ असले, तरी केवळ पैशाने नव्हे तर स्वतः जागृत राहून पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अहोरात्र घेतलेली मेहनत आवश्यक असते, हे डॉ. अथर्व यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या संघर्षमय आणि यशस्वी प्रवासामुळे आजची युवा पिढी आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
“गावाकडे चला, लोकांची सेवा करा”
या यशानंतर डॉ. अथर्व रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अत्यंत भावनिक विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “माझे पुढील उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘गावाकडे चला आणि गावाचा विकास करा’ या विचारांनुसार काम करणार आहे. माझ्या जन्मभूमीतील गोरगरीब जनतेची, ग्रामीण भागातील रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणे हेच माझे अंतिम ध्येय आहे.”
डॉ. अथर्व यांच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून, नामदेव शिंपी समाजबांधव, नातेवाईक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रमंडळी आणि तळा शहरवासीयांकडून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


