शिवसेनेच्या दहीहंडीत खारी पथकाचा जल्लोष
मागील वर्षीची हुकलेली संधी यंदा साधली; प्रथम क्रमांकासह १ लाख २१ हजारांचे बक्षीस
रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते
रोहा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी स्पर्धेत गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मागील वर्षी अवघ्या काही अंतराने हुकलेला विजय यंदा खेचून आणत लाटनेश्वर खारी गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. खारीच्या गोविंदांनी आठ थरांचा थरार उभा करत दहीहंडी फोडताच ‘खारी गावची पोरं लय हुशार!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना युवा नेते आकाश भैया धोत्रे आणि महेंद्र दळवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्ष पाटील यांच्या नियोजनातून या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रोहा तालुक्यातील विविध गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
मागील वर्षी आठ थर लावण्यात अपयश आलेल्या खारी गोविंदा पथकाने यंदा मानाची दहीहंडी फोडण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी पथकाने कसून सराव करत जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली. अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि शिवसेनेच्या दहीहंडी स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी होण्याचा मान त्यांनी मिळवला.
प्रथम क्रमांकाच्या खारी गोविंदा पथकाला आकाश भैया धोत्रे यांच्या हस्ते १ लाख २१ हजार रुपयांची रोख रक्कम आणि मानाची गदा प्रदान करण्यात आली.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले, रायगड जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रमोदजी घोसालकर, जिल्हा परिषद सदस्य सुमित काते, उर्वशी उद्वेश वाडकर, तालुकाप्रमुख उद्वेश वाडकर,संपर्क प्रमुख श्री संदेश मोरे, शिवसेना नेते अशोकशेठ धोत्रे, संतोष पोटफोडे, सौ. पूजा पोटफोडे, शिल्पाताई धोत्रे, सुरेशदादा महाबले, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत लोखंडे, निलेश वारंगे, समीर महाबले, मंगेशशेठ सरफळे, उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, विजय बोरकर,
संतोषशेठ खेरटकर, लालताशेठ कुशवाह, उस्मानभाई रोहेकर, शहरप्रमुख मंगेश रावकर, युवा सेना तालुकाप्रमुख रोशन पवार, युवा सेना शहराध्यक्ष राहुल गुरव, अमलाकांत मोरे, राजेश डाके, नारायण खुळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुसऱ्या वर्षीही भव्य आयोजन
शिवसेनेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी रोह्यात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाची दहीहंडी विशेष चर्चेचा विषय ठरली. या आयोजनातून रोहा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे राजकीय चित्रही अधोरेखित झाले.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यात शिवसेना सक्रिय होत असून, पक्षात सुरू असलेल्या नेत्यांच्या प्रवेशामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेची दहीहंडी केवळ उत्सव न राहता रोह्यातील आगामी राजकीय शक्तिप्रदर्शनाची झलक ठरल्याची चर्चा रंगली.