रोह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली होणार; चिंतामणराव देशमुख विद्यालयात अकरावी-बारावी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर
रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते
रोहा शहरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी, यासाठी रोहा नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. डॉक्टर चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालय, रोहा येथे इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठीचा अधिकृत प्रस्ताव १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आवक क्र. 9695367 अन्वये सादर करण्यात आला.
माजी खासदार सुनीलजी तटकरे, मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्या सहकार्याने तसेच सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून डॉक्टर चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावी व बारावीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. रोहा शहराची वाढती लोकसंख्या, परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा तसेच उच्च माध्यमिक शिक्षणासाठी उपलब्ध सुविधा यांचा विचार करून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रोह्याबाहेरील महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व प्रवासाचा खर्च वाढण्याबरोबरच पालकांवरही आर्थिक भार पडतो. स्थानिक पातळीवरच अकरावी-बारावीचे शिक्षण उपलब्ध झाल्यास शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रस्तावामुळे रोहा परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी जवळच उपलब्ध होण्यास मदत होणार असून, रोहा शहराच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
प्रस्ताव सादर करताना शिक्षण व क्रीडा सभापती रविंद्र चाळके, नगरसेवक अजीत मोरे, नगरसेवक प्रशांत कडू, नगरसेवक आरबाज मनेर, स्वीकृत नगरसेवक माझ सवाल तसेच सामाजिक कार्यकर्ते कादिरबाय रोगे उपस्थित होते.