उद्देश वाडकर यांची रोहा तालुकाप्रमुखपदी नियुक्ती कायम; स्थगितीचे पत्र रद्द स्थगितीचे पत्र काढल्यानंतर काही तासांतच रात्री नियुक्तीचे नवे पत्र; जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचे स्पष्टीकरण
उद्देश वाडकर यांची रोहा तालुकाप्रमुखपदी नियुक्ती कायम; स्थगितीचे पत्र रद्द
स्थगितीचे पत्र काढल्यानंतर काही तासांतच रात्री नियुक्तीचे नवे पत्र; जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचे स्पष्टीकरण
रोहा प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक वर्तुळात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. रोहा शिवसेना तालुका प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून उद्देश वाडकर यांची करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून, याबाबत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पुन्हा पत्र देऊन स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, स्थगितीचे पत्र जारी झाल्यानंतर काही तासांतच रात्रीच्या वेळी नियुक्ती कायम ठेवण्याचे नवे पत्र देण्यात आल्याने या घडामोडीची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
उद्देश वाडकर यांची रोहा तालुका प्रभारी तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देणारे पत्र जारी करण्यात आले. मात्र, हे पत्र चुकून काढण्यात आले असल्याचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी नव्या पत्रातून स्पष्ट केले असून, सदर स्थगितीचे पत्र रद्द करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वाडकर यांची तालुकाप्रमुखपदाची नियुक्ती कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जिल्हाप्रमुखांनी नव्याने पत्र देत वस्तुस्थिती स्पष्ट केल्याने हा संभ्रम दूर झाला आहे.
उद्देश वाडकर हे शिवसेनेचे धडाडीचे आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून, सर्वसामान्य नागरिकांपासून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी तसेच शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
वाडकर यांच्या पत्नीची जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झालेली असून, वाडकर कुटुंबाचा परिसरात चांगला जनसंपर्क आहे. सामाजिक आणि संघटनात्मक कामातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे रोहा तालुक्यात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा पक्षाला फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थगितीचे पत्र आणि त्यानंतर काही तासांतच नियुक्ती कायम ठेवण्याचे पत्र अशी घडलेली ही घडामोड सध्या चर्चेचा विषय ठरली असली, तरी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नव्या पत्रामुळे उद्देश वाडकर यांची रोहा तालुका प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता आगामी काळात वाडकर यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे आव्हान असणार आहे. पक्ष वाढीसाठी धडाडीने काम करणाऱ्या वाडकर यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.