देवकान्हे-पालदाड मार्गावर जीवघेणे खड्डे; स्थानिक आमदार-खासदार गेले कुठे? संतप्त नागरिकांचा सवाल .
कोलाड (श्याम लोखंडे)
मुंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेला रोहा तालुक्यातील पालदाड खांब मुख्य रहदारीतील समजल्या जाणाऱ्या देवकान्हे ते पालदाड रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून संपूर्ण मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे या खड्ड्यांमध्ये चिखल आणि पाणी साचल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून खड्ड्यातून एखादे वाहन गेल्याने त्यातील चिखल आणि घाणीचे पाणी हे पादचारी वर्गावर उडून त्याचे जलाभिषक होते. तसेच हे भले मोठे खड्डे असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी, “आमचे लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार नेमके गेले कुठे? या मार्गाच्या दुरुस्तीसाठी वाली कोण?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
भयानक पडलेल्या खड्यांच्या साम्राज्याचे करावे काय कोणी याला वाली आहे का रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून ठिकठिकाणी मोठे आणि खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री न दिसल्याने अपघात होत असल्याचे बोलले जात आहे. खांब, नडवली, तळवली , चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे, बाहे आदी ग्रामस्थ नागरिकांचा प्रवास या मार्गावरवरून होत आहे तसेच मालसई, मुठवळी, सांगडे , उडदवणे, या परिसरातील बहुतांश नागरिक याच मार्गावरून जा ये करत असतात तर असंखे नजीकच्या एमआयडीसी कारखानदारीत रोजगारासाठी त्याच बरोबर रोहा बाजारपेठेत सामान खरेदीसाठी जा ये करत असतात तर दुचाकीस्वार यांना काहीसा या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत.तर रात्रीच्या सुमारास हा धोका अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काहीसा दळणवळण असल्यामुळे शेतमाल बाजारात नेण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रिक्षा चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले आणि पादचाऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे.तर गणपती सणासुधीआधी या मार्गावरील खड्डे भरण्यासाठी सदरील खात्याने पुढाकार घेऊन पुढील अपघात टाळण्यासाठी उपाय योजना योजना करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.
पिंगळसई ते देवकान्हे या मार्गाची अनेक वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी काहीसा विशेष निधी प्राप्त करून दिल्याने ही सडक नव्याने डांबरीकरण करण्यात आली होती मात्र तद्नंतर याची साधी आजतागायत डागडुजी देखील होत नाही हा सवाल उपस्थित केला जात असून त्यामुळे संतप्त नागरिकांची मागणी निवडणुकीपुरतेच मते मागण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी आता या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.तर कोणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासनाला अथवा लोकप्रतिनिधींना यावर उपाय केल्या जातील का? तर प्रशासनाने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे खड्डे भरावे आणि कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


