स्वखर्चातून आणि श्रमदानातून रस्त्याची डागडुजी करत सामाजिक बांधिलकीचा दिला संदेश
पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर ) मुंबई–गोवा महामार्गाची रडकथा महामार्गलगतच्या पुगाव स्टॉपपासून रहिवासी नारायण हर्नेकर यांच्या घरापर्यंत ग्रामपंचायत पुगांवच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे ये-जा करणाऱ्या सायकलस्वार, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. खड्ड्यांमध्ये वाहने आदळून अपघात होण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.तर
या समस्येबाबत ग्रामस्थ तसेच श्री गणेश मित्र मंडळ पुगांव यांच्या स्वखर्चातून व श्रमदानातून या रस्त्यावरील खड्डे आणि त्याची डागडुगी करण्यात आली असून एक आगळा वेगळा समाजापुढे सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे.
येथील ग्रामस्थ नागरिकांनी या बाबत ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामअधिकारी यांच्याकडे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र,प्रशासनाकडून यावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी तसेच श्री गणेश मित्र मंडळ पुगांवच्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत यावरील खड्डे भरून त्याची डागडुजी करत येथील नागरिकांची समस्या दूर करत प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.
तर शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजल्यापासून पहाटे २.३० वाजेपर्यंत मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत स्वखर्चातून व स्वकष्ट श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. तर विशेष खडी व सिमेंटच्या मिश्रणाचा वापर करून खड्डे व्यवस्थित भरून रस्ता वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
“मनात इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर आपणच आपल्या गावाचा विकास घडवू शकतो” या ब्रीदवाक्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवत श्री गणेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण गावासमोर ठेवले आहे.
गावातील एखादी समस्या प्रशासनाच्या प्रतीक्षेत न ठेवता, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्वतःच्या श्रमातून आणि स्वखर्चातून ती सोडविण्याचा मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला असून एक आगळा वेगळा संदेश दिला आहे.
या सामाजिक उपक्रमाबद्दल पुगांव गावातील तसेच रहिवाशी सर्व ग्रामस्थांकडून श्री गणेश मित्र मंडळ पुगांवच्या सर्व सदस्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.