मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव!
कोलाड (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाचा तिढा अखेर सुटला असुन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड होताच कोलाड आंबेवाडी नाक्यावर शिवसैनिकांचा एकच जल्लोष कोलाड विभाग शिवसेनेच्या वतीने लाडू वाटून व फटाके फोडून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोलाड विभागातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून पालक मंत्री पदावरून मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरु होती.मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पालक मंत्री रहावे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छा होती तर भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे अशी शिवसेनेची इच्छा होती या परस्पर विरोधी भूमिकामुळे दिड वर्षे रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय प्रलंबित राहिला होता.
स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान भरतशेठ गोगावले यांना मिळाला परंतु पालक मंत्र्याची अधिकृत घोषणा झाली नाही.अखेर वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्ती नंतर रायगडच्या पालक मंत्री पदाचा तिढा सुटला असून रायगडच्या पालक मंत्री पदी शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांची निवड होताच कोलाडमध्ये शिंदे गट शिवसैनिकांचा आनंद गगनाला भिडला आणि मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात केला.


