कारभारातील त्रुटींवर आमदारांचा संताप; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करा!
प्रतिनिधी /गणेश पवार
माथेरानच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीची दखल घेत कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची चांगलीच कानउघाडणी केली. नगरसेवकांना योग्य सन्मान न देणे, कार्यालयीन कामकाजातील दिरंगाई, ठरावांच्या व इतिवृत्ताच्या प्रती वेळेत उपलब्ध करून न देणे तसेच प्रशासनातील समन्वयाचा अभाव आदी मुद्द्यांवर आमदारांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला.
३ ऑगस्ट रोजी माथेरान नगरपरिषदेच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात शहराच्या विकासासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी आमदार थोरवे यांनी रिगल हॉटेल येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बैठकीस नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नगरसेवकांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले. मुख्याधिकारी दुपारी उशिरा कार्यालयात येतात आणि सायंकाळी लवकर निघून जात असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावर आमदार थोरवे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडून खुलासा मागितला. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी एसआयआरच्या कामामुळे वेळेचे नियोजन बिघडत असल्याचे स्पष्टीकरण दिले.
नगरसेवक मनोज खेडकर यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या ठरावांच्या आणि इतिवृत्ताच्या प्रती अद्याप नगरसेवकांना देण्यात आलेल्या नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचारी अपुरे असल्याचे कारण सांगितले. त्यावर शिक्षण समितीचे सभापती सुनील शिंदे यांनी आवश्यकता भासल्यास प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून इतिवृत्त लेखनाची मदत घेण्याचा प्रस्ताव मांडला. या सूचनेला आमदार थोरवे आणि मुख्याधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आठ दिवसांत सर्व प्रती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
बांधकाम सभापती गौरंग वाघेला यांनी कार्यालय अधीक्षक सदानंद इंगळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत नगरसेवकांना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचा आरोप केला. यावर आमदार थोरवे यांनी सदानंद इंगळे यांनाही फटकारत लोकप्रतिनिधींशी समन्वयाने वागण्याच्या सूचना दिल्या.
नियोजन सभापती शिवाजी शिंदे यांनी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. सभागृहात चर्चा सुरू असताना अरेरावीची भाषा वापरून नगरसेवकांना गप्प बसवले जाते, असा आरोप त्यांनी केला. मात्र, नगराध्यक्ष चौधरी यांनी हा आरोप फेटाळून लावत आपण कधीही अशा प्रकारची भाषा वापरली नसल्याचे स्पष्ट केले.
बैठकीच्या शेवटी आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी परस्पर समन्वयातून काम करण्याची गरज अधोरेखित केली. “माथेरानमध्ये जनतेने विश्वासाने सत्ता दिली आहे. तो विश्वास टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. मागील सात महिन्यांत काय झाले, यापेक्षा आता विकासकामांना गती कशी देता येईल यावर भर देऊया. यापुढे प्रत्येक महिन्याला विकासकामांचा आढावा घेतला जाईल आणि मुख्याधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल सादर करावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहात मच्छर चावल्याने स्वच्छतेवर संताप
आढावा बैठकीदरम्यान बाळासाहेब ठाकरे सभागृहात आमदार महेंद्र थोरवे यांना मच्छर चावल्याने त्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपालिकेच्या सभागृहातच अशी परिस्थिती असेल, तर शहराची अवस्था काय असेल?” असा सवाल करत त्यांनी सर्व नगरसेवकांना आपल्या प्रभागात नियमित फिरून लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले. “स्वच्छता मोहिमेसाठी मला देखील बोलवा, मी स्वतः सहभागी होईन. नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्या आणि त्यांचे निराकरण करा, अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या.