रोहा-अष्टमी नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण
‘स्वतःच्या घराचे स्वप्न’ साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा-अष्टमी नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.
यावेळी नगराध्यक्षा कु. वनश्री अवनी समीर शेडगे, उपनगराध्यक्ष श्री. अहमद दर्जी, शिक्षण व क्रीडा सभापती रवींद्र चाळके, नगरसेविका डॉ. प्रियांका धनावडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वप्नील धनावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन करताना शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी रोहा-अष्टमी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना सुरक्षित, सन्माननीय आणि कायमस्वरूपी निवारा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रमाणपत्र स्वीकारताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. स्वतःचे घर मिळण्याच्या आशेने अनेकांनी शासन व नगर परिषदे प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी पात्र लाभार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यातही शासनाच्या विविध विकासकामां बरोबरच जनहिताच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार रोहा-अष्टमी नगर परिषदेमार्फत व्यक्त करण्यात आला.


